Friday, May 1, 2026

Kavi Krishna Bhatt Bandkar | Mathasta Ramchandra Sharma

Below is an article from a rare book named Saraswat Ratnamala, by Mathasta Ramachandra Sharma. He had documented lives of some prominent Saraswats who achieved greatness in their respective fields. After listening to Vishwacha Vishram Re, rendered by Pt. Jitendra Abhisheki, i was curious about the life story of its author, as the lyrics were very unusual. My discovery led me to this. I am finally able to get this done with the help of AI. Will fix the typo errors in time

कृष्ण जगन्नाथभट्टजी बांदकर.

" जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत । 

जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ 

चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । 

तोचि जाणिजे महानुभाव । संत साधु ॥ " 

समर्थ रामदास.


AI Enhanced

भक्ति, ज्ञान व कर्म किंवा आचार यांपैकी कोणत्याही एका मार्गाकडे सामान्य-जनाची प्रवृत्ति निरनिराळ्या काळीं शिथिल होत जाते; असा सृष्टिनियम आहे. आणि ज्याकाळीं जेथें ज्या मार्गाचें संशोधन व उत्कर्ष होण्याची आवश्यकता अधिक दिसून येते त्याकाळीं तो दयाघन भगवान तेथें त्या मार्गाचें अवलंबन स्वतः करून आपल्या प्रबोधशक्तीनें व आचरणानें इतरांकरवींही करविण्याजोगें पूर्वार्जित तपः-सामर्थ्य ज्याचें अंगीं असतें अशीच लोकोत्तर विभूति निर्माण करितो. हा अनादि-कालीन सिद्धांत सर्वांच्या परिचयांतला आहे. यास अनुसरूनच साधुसंताचा अवतार वेळोवेळीं या भूतलावर झालेला आहे. व होत आहे. त्यांपैकींच प्रस्तुतचरित्रनायक कृष्णभट्टजीमहाराज हे एक होत. त्यांचें जीवनवृत्त थोडक्यांत आम्ही येथें सादर करितो.

" यद्यद्विभूति मत्स्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ " या भगवदुक्तीप्रमाणें पुरुषाच्या अंगीं कांहींतरी तशाच प्रकारचा ईश्वरी तेजांश असल्यावांचून त्यांचीं चरित्ररूपानें अक्षय्य स्मारकें होणार नाहींत हें उघड आहे.

गोवें प्रांताची राजधानी जें पणजी शहर तेथून आग्नेयदिशेस सुमारें तीन चार कोसांचें अंतरावर डोंगरी नांवाचा एक लहानसा गांव आहे मध्यभागीं डोंगर असून सभोवतीं सर्व घरें असल्यामुळें त्यास ‘डोंगरी’ असें अभिधान प्राप्त झालें आहे. ह्या डोंगरी गावांत जगन्नाथभट्टजी नामक एक वैष्णव संप्रदायी कर्मनिष्ठ सत्वशील वैदीक ब्राम्हण राहत असत. तत्कालीन इतर वैदीकांप्रमाणें ते केवळ बहिरंग पूजेअर्चंतच इतिकर्तव्यता मानणारे नव्हते. ते श्रीपांडुरंगाचे तीव्र उपासक होते. त्यांस अल्पस्वल्प साक्षात्कारही असल्याचें कांहींजणास माहीत होतें. त्यांच्या सौभाग्यवतीचें नांव नरसाई असें होतें. तिच्या उदरीं शके १७६६ क्रोधी संवत्सर आषाढशुद्ध ११ दशीच्या महापर्वणीस कृष्णभट्टजीचें जन्म झालें. त्यांच्या घरची स्थिति फार गरिबीची होती.

तरी अतीतअभ्यागताचा आदरसत्कार त्यांच्या घरीं मोठ्या प्रेमानें होत असे. इतकेंच नाहीं तर आपल्या घरीं भजन, पूजन, कीर्तन, संतर्पण वगैरे नेहमीं होत असावें अशी जगन्नाथभटजींची फार प्रबळ वासना होती. त्याप्रमाणें ती पूर्ण करण्यासाठींच कीं काय हा महाभाग पुत्र त्यांचे उदरीं श्रीकृष्ण नांवानें जन्मास आला ! जगन्नाथ-भट्टजी सहकुटुंब त्रिपतीच्या यात्रेस गेले असतां तेथेंच त्यांचा अंत झाला. त्यावेळीं कृष्णभट्टजीचें वय अवघें सवा वर्षांचें होतें. अशा कुमारावस्थेंत त्यांस पित्याबरोबर अनायासें त्रिपतीची यात्रा घडली यावरून त्यांचें पुण्यतर देहप्रारब्ध दिसून येते. पित्याचे मागें त्यांचें लालनपालन मुकुंदभट्टजी नामक त्यांच्या चुलत्यानें केलें. " प्रसाद चिन्हानि पुरः फलानि " म्हणजे ‘ मुलाचे पाय पाळण्यातच दिसूं लागतात ’ या म्हणीप्रमाणें कुमारावस्थेंत सुद्धां कृष्णभट्टजीस इतर मुलांप्रमाणें सामान्य खेळ आवडत नसत. त्यांचा मुख्य आवडता खेळ म्हटला म्हणजे नारळीच्या पिड्यांस लहान काठ्यांच्या खुंट्या करून व काथ्याच्या दोऱ्या (तारा) लावून तो लहानसा विणा कल्पून खांद्यावर टाकावा, आणि लाकडाचे अगर दगडाचे तुकडे कधीं कधीं खरोखरीचेच टाळ घेऊन ते इतर सोबत्यांकडे वाजविण्यास द्यावे आणि अशारीतीनें त्यांनीं भजन-कीर्तनाची मौज करीत असावें. केव्हा केंव्हां चौरंगावर फाटके तुटके कागद ठेवून बोबड्या भाषेनें पुराण सांगण्याचीही ते नक्कल करीत असत. त्यांचें स्वरूप फार मोहक असल्यामुळें गांवातील लोक कांहीं खाऊ वगैरे देण्याची लालूच दाखवून त्यांस आपल्या घरीं घेऊन जात, आणि चुलत्यानें शिकविलेले श्लोक, अभंग, पदें वगैरे म्हणून घेत. त्यांचा आवाज इतका गोड होता कीं, ते एखादें पद प्रेमळ अंतःकरणानें म्हणू लागले म्हणजे श्रोते मंडळी तल्लीन होत. आतां ह्यात असलेले त्यावेळचे लोक असें सांगतात कीं, एखादेवेळीं घरातील मंडळी जेवण्याच्यावेळीं शेजारच्या घरांतून दही ताक वगैरे मागून आणण्यास त्यांना पाठवीत व ते गेलेसें पाहून मंडळी जेवायास बसे. इकडे यांचे जेवण संपत आलें तरी त्यांच्या दहीताकास ठिकाण नाहीं ! मग मंडळींनीं जेवण सारून त्यांचा तपास करावा तर त्यांची स्वारी एका हातांत दह्याचें भांडे घेऊन व दुसऱ्या हातानें हावभाव करीत पदें म्हणण्यांत दंग झालेली आढळें ! ! अमुक कामासाठीं आपण आलों याची त्यांस स्वतः कधींच स्मृति होत नसे. इतकी त्यांची लहानपणापासून भगवद्भजनीं एकतानता होती. अशा या त्यांच्या भगवद्भजनीं रंगलेल्या वृत्तींत पद्धतशीर विद्याभ्यासाचा योग मात्र त्यांस कधींच जमून आला नाहीं व तो येणेंही शक्य नव्हतें. कारण बालबोध चारदोन पुस्तकेंही शिकण्याची तेथें सोय नव्हती. योग्यकालीं विधीयुक्त मौंजीबंधन झाल्यावर वैदीकीवृत्तीस अनुकूल असे संहिता, प्रयोग वगैरे मात्र त्यांस पढविण्यांत आले होते. बाकी संस्कृत भाषेचा अभ्यासही साधारणच होता. म्हणजे रघुवंश काव्यांपैकीं दुसऱ्या सर्गातील अवघे चौदा श्लोक म्हटलेले !! पण त्यांची इतकी तैलबुद्धि होती कीं, पुढें पुढें जरा वयांत येतांच गीता, अध्यात्मरामायण, भागवत इत्यादि ग्रंथांशीं त्यांनीं स्वतः फार चांगला परिचय करून घेतला. संस्कृत भाषेची त्यांना मनापासून आवड होती म्हणून वरील ग्रंथांचीं पारायणें ते मोठ्या प्रेमानें करीत असत. थोड्याच दिवसांत त्या ग्रंथांतील केवळ शब्दार्थच नव्हे तर महत्त्वाचें निरूपणही ते इतर पृच्छकांस सांगूं लागले. शब्दार्थ असो किंवा भावार्थ असो, त्याच्या दृढअभ्यासानें तो लवकर कळूं लागतो. “ Read desiring to know and you will understand. ” असें एका अमेरिकन विदुषीचें म्हणणे आहे. त्यांतील आशयही हाच होय.

कृष्णभट्टजी चांगले वयांत येईपर्यंत त्यांना प्रपंचांतील दगदग अशी मुळींच जाणवली नाहीं; परंतु जेव्हां त्यांचे चुलते मुकुंदभट्टजी कालाधीन झाले तेव्हां मात्र त्यांना भिक्षुकीवृत्तीनें आणि लोकांची मनधरणी करून चरितार्थ चालविणें फार कंटाळवाणें व जड वाटूं लागलें. त्यांची पत्नीही सुस्वभावी, शांत, प्रेमळ, विचारशील इत्यादि गुणांनीं मंडीत अशी साध्वी होती; यामुळे त्यांना प्रपंचांतील उद्वेगजनक स्थितीचा कडू अनुभव केव्हांही येण्यास मार्ग नव्हता. पुढें कृष्णभट्टजींनीं आपला आवडता भगवद्भजनाचा व्यवसाय अव्याहत चालण्याकरितां कांहीं पाठांतर करून स्वतःच्या बुद्धिबळावर प्रसिद्धपणें ते देवस्थानांत कीर्तनें करूं लागले; पण द्रव्यार्जनाकरितां त्यांनीं केव्हांही कीर्तन केलें नाहीं व त्या कामासाठीं त्यांनीं कोणापाशीं याचनाही केली नाहीं. एकदां पुणेकर उपनांवाचे कोणी हरिदास गोवें-प्रांतीं आले होते. पुष्कळ ठिकाणीं देवस्थानांत वगैरे त्यांचीं कीर्तनें झालीं. कृष्णभट्टजी स्वभावतः नक्कल करण्यांत फार प्रवीण होते, कोणतेंही भाषण, गायन वगैरे हुबेहुब वठविण्यांत त्यांचा हातखंडा असे. पुणेकरांचीं दोनचार कीर्तनें ऐकतांच अगदीं त्यांचेचप्रमाणें हावभाव करून इतर कांहीं ठिकाणीं हे कथा करूं लागले आणि त्याबद्दल रसीकलोकांनीं त्यांची वाहवा केली; पण कांहीं परोत्कर्षासहिष्णु मंडळींनीं पुणेकरबुवांना चिथवून ‘तुमची थट्टा अमुक अमुक भट्टरूडा करितो, यासाठीं त्याचा यथेष्ट समाचार घ्यावा’ म्हणून अनेकदां सुचविलें. या कुटिल दुर्जनांस असें वाटलें होतें कीं, बोवा आतां कांहीं तरी गरल भट्टजीमहाराजांवर घालतील व आम्हांसही आयती मौज पाहण्यास मिळेल; परंतु तें सर्व त्यांचें मनांतलें मनांत राहिलें. आपलें अनुकरण भट्टजीमहाराज करितात असें ऐकल्याबरोबर पुणेकरांस फार आनंद झाला व ते म्हणाले शाबास ! धन्य आहे त्याची. असें जर तो माझें अनुकरण करितो तर तो माझा आवडता शिष्यच आहे असें मी समजतों. हे पुणेकरबुवांचे शब्द ऐकून ते कुटीललोक ओशाळे होऊन घरीं गेले. त्यानंतर पुणेकरबुवा भट्टजीमहाराजांस स्वतः भेटून ते त्यांचें कीर्तन ऐकून परम आनंद पावले आणि ‘माझ्या अनुकरणांत तुझा शुद्ध हेतु ओळखून या तुझ्या अनुपम चातुर्याबद्दल मला फार आनंद झाला आहे. कोणाच्याही कुचेष्टेस न जुमानतां निर्भयपणें तूं अशीच कथा करीत जा ! कीर्तनांत तुझी बरोबरी कोणीही करूं शकणार नाहीं.’ असें ते म्हणाले. हें बुवांचें भाषण ऐकून भट्टजींसही मोठें कौतुक वाटलें असेल यांत नवल नाहीं ? यावेळीं त्यांचें वय सतरा अठरा वर्षांचें होतें. सारांश, “ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी” हेंच खरें.

अशारीतीनें कृष्णभट्टजी आनंदानें कालक्रमणा करीत असतां घरचा प्रपंच वाढूं लागला आणि दिवसेंदिवस मुलाबाळांची व येणाऱ्या जाणाऱ्या अतीतअभ्यागतांची जोपासना त्यांच्या मनाप्रमाणें होईनाशी झाली; कारण मिळकत थोडी खर्च फार. अशा स्थितींत “संसारदुःख दुखावला। त्रिविधतापें पोळला। तोचि एक अधिकारी झाला। परमार्थासी॥” या समर्थांच्या अनुभवसिद्ध उक्तीप्रमाणें त्यांचें चित्त संसारसुखास विटलें व परमार्थलाभाविषयीं त्यांय इच्छा उत्पन्न झाली; पण गुरूवांचून परमार्थाचा लाभ कसा मिळणार ही विवंचना त्यांस पडली, आणि तदनुरूप ते गुरूच्या शोधांत राहिले. एकदां ते बांदिवडें गांवांत मणपे नामक एक गृहस्थ त्यांचे स्नेही होते, त्यांकडे कांहीं कामानिमित्त गेले होते. त्यावेळीं मणपे हे पंडितांचा ‘यथार्थदीपिका’ ग्रंथ वाचीत बसले होते. “तद्विद्धिप्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः” या श्लोकाच्या टीकेवर त्यांचें प्रवचन चाललें असतांना मध्यंतरीं “जरी व्हावा तुज देव। तरी हा सुलभ उपाय॥ करी मस्तक ठेंगणा। लागे संतांच्या चरणा॥” अशी साधूक्ती त्यांच्या मुखांतून निघालेली भट्टजींच्या कर्णरंध्रांत दुमदुमली व लगेंच त्यांतला भाव जाणून ‘असे संत हल्ली कोठें असतील काय?’ म्हणून त्यांनीं मणपेस प्रश्न केला; तेव्हां ‘शोधणाऱ्यास पुष्कळ आहेत’ असें ते म्हणाले. त्याबरोबर भट्टजींनीं त्यांचेच पाय धरिले व अनुग्रहार्थ करुणा भाकिली; पण त्यांची बुद्धिमत्ता व तीव्र मुमुक्षुत्व ओळखून हें धेंड आपणाकडे उपयोगी नाहीं असा विचार करून त्यांनीं विष्णुबोवा सोमन नामक वेंगुर्ल्यांत राहणाऱ्या एका थोर साधुपुरुषाकडे जाण्यास त्यांस सांगितलें; तेव्हां ‘हिरवें शोधणाऱ्यास भाजलेलें मिळावें’ त्याप्रमाणें कृष्णभट्टजी लगेंच घरीं आले, आणि पत्नी प्रसूत होऊन नुकतेच दोन तीन दिवस झाले होते, घरांत मुठभर दाणे किंवा एक छदामही नव्हता; पण त्याची यत्किंचितही काळजी न करितां त्यांनीं एकदम वेंगुर्ल्यास जाण्याचा निश्चय केला व शके १७९१ शुक्लसंवत्सर आषाढ वद्य ७ मी शुक्रवारी पहाटेस मुसळधार पाऊस पडत असतांही कोणास न कळवितां ते घरांतून बाहेर पडले. मध्यंतरीं मार्गात प्रवासासंबंधीं अनेकप्रकारचे कष्ट सोशीत अन्नोदकाचा संपर्कही न करितां दोन दिवसांनीं ते वेंगुर्ल्यास पोंचले. इकडे घरातील मंडळींचे काय हाल झाले असतील व त्यांना किती चितेंत काळ काढावा लागला असेल याची कल्पना सहृदय वाचकांनींच करावी ! वास्तवीक “देवाच्या सख्यत्वासाठीं। पडाव्या जिवलगासी तुटी। सर्व अर्पावें शेवटीं। प्राण तोही वेंचावा॥” किंवा “देव जोडे तरी करावा अधर्म” इत्यादि निवृत्तिपर अशा साधुसंतांच्या अनुशासनावरून पाहतां भट्टजींचें आचरण अगदीं योग्यच झालें असें म्हटलें पाहिजे. ‘देव हृदयांत आहे त्याच्या प्राप्त्यर्थ कोणासही गुरू करण्याची आवश्यकता नाहीं’ दृढ उपासना चालविली म्हणजे गुरू व संत घरीं चालत येऊन कृपा करितात’ इत्यादि सत्य पण शरीरकष्टाच्या भयानें लांब लांब गप्पा मारणाऱ्या जिज्ञासूंनीं भट्टजींच्या या वृत्तीचा व धैर्याचा चांगला विचार करावा आणि तीव्र मुमुक्षुत्व कसें असतें याची थोडी अटकळ आपल्या मनाशीं बांधावी अशी आमची नम्र सूचना आहे. असो.

वेंगुर्ल्यास पोंचल्यावर लगेंच विष्णुबोवांची गाठ पडली. मोठ्या सद्गदित अंतःकरणानें त्यांनीं त्यांस साष्टांग प्रणिपात केला. बराच वेळ झाला तरी स्वारी उठेंना, तेव्हां विष्णुबोवांनीं स्वतः जवळ जाऊन त्यांना उठविलें. उघडच आहे; कारण “तो टोणपा ढकलितां पडे जाणे। परि पडला तो उठों नेणें॥ कीं मस्तकीं पद्महस्त बाणें। उठे प्रभावें तयाच्या॥ अचेतन दंड पडला। तो टोणपा सचेतनें उचलिले। तैसा जडात्मत्व जाणणार याला। उचली कोण चिदात्मत्वें त्यावांचुनी॥” नंतर सर्व आगत-स्वागतदि कुशल प्रश्न झाल्यावर आत्मज्ञानाची अत्युत्कट जिज्ञासा व पूर्ण अधिकार दिसून आल्यामुळें विष्णुबोवांनीं दुसऱ्या दिवशीं सांप्रदायिक पद्धतीनें महावाक्याचा उपदेश देऊन त्यांना कृतार्थ केलें. हा गुरू कडून मिळालेला अगम्यज्ञानाचा ठेवा भट्टजींनीं आपल्या “स्वात्मतत्त्वामृतशतक” नामक ग्रंथांत फार चांगल्या तऱ्हेनें उघड केला आहे. जिज्ञासूंनीं एकवार तो ग्रंथ अवश्य मनन पूर्वक वाचावा.

पुढें कांहीं दिवस सद्गुरूसेवेंत काल घालवावा व हीच सेवास्वरूप गुरूदक्षिणा अर्पण करावी असा त्यांचा फार हेतु होता; पण बोवा म्हणाले—“नारायण असे विश्वीं। त्याची पूजा करीत जावी।” म्हणजे झालें. तीच आमची सेवा समजून वर्णाश्रमधर्माप्रमाणें सर्व प्रपंच चालवावा. कारण “उपासनेचें उत्तीर्ण व्हावें। भक्तजनें वाढवावें। अंतरीं विवेकें उमजावें। सकळ कांहीं” यासाठीं घरीं श्री रामरायाची मूर्ती स्थापन करून भजन-पूजन-कीर्तनादिकांनीं जडजनोद्धारार्थ भक्तिमार्गाचा विस्तार होईल तेवढा करीत जावा; म्हणजे त्यांतच आमची गुरूदक्षिणा वगैरे आली. विशेषतः भट्टजींच्या मनांतून तेथून निघावयाचेंच नव्हतें; पण गुरूज्ञा अनुल्लंघनीय जाणून स्वेच्छेविरुद्ध मोठ्या कष्टानें ते गुरू महाराजांचा निरोप घेऊन परत आपल्या गांवीं आले व लवकरच त्यांनीं आपल्या पर्णकुटींत श्रीरामस्थापना करण्याचा विचार ठरविला आणि त्याप्रमाणें फोंडें महालापैकीं बोरी गांवांत राहणाऱ्या ‘सांवळ्या’ नामक एका प्रसिद्ध व प्रेमळ कारागिरास लांकडाची पञ्चाभिक्षित श्रीसीतारामांचीं मूर्ती करून आणण्यास सांगितलें. नंतर तो एकदां आपल्या गांवांजवळील ‘सिद्धनाथाचा’ डोंगर चढून जात असतां मध्येंच त्याचा पाय कोणीं धरल्याप्रमाणें एकदम जड झाला. मोठ्या कष्टानें त्यानें आपला पल्ला गांठला. पण तिकडून परत येतांना पूर्वीच्याच जाग्यावर पुनः पायाला असह्य वेदना होऊं लागल्या. तेव्हां हा काय चमत्कार ! म्हणून त्यानें आजुबाजूंस पाहिलें तों तेथें एक काळी कुळकुळीत अशी शिळा त्यांच्या दृष्टीस पडली व लगेंच त्याच्या मनांत असा विचार आला कीं, ‘डोंगरीकर भट्टमामाना जर या शिळेची मूर्ति करून दिली तर त्यांस लांकडी प्रतिमेपेक्षां अधिक संतोष होईल.’ म्हणून त्यानें हात टेकत टेकत मोठ्या कष्टानें ती शिळा उचलली. तोंच त्याचा पाय अगदीं वेदनारहित झाला. त्याबरोबर सर्वांतर्यामि प्रभू जो राम त्याचीच ही सर्व लीला आहे. अशी त्यानें खुण गांठ बांधिली व ती शिळा घेऊन तो आपल्या घरीं आला. आणि तिच्यावर त्यानें श्रीरामाची मूर्ति कोरण्यास आरंभ केला. तो इतक्यांत तेथें असा चमत्कार झाला कीं, त्या शिळेवर त्यानें जेव्हां पहिली टाकी मारली त्याबरोबर पणजीं-तील दोनप्रहरची बारा वाजण्याची तोफ उडालेली सर्वांच्या कानीं पडली !! यावरून श्रीरामजन्माच्या वेळेसच त्या पाषाणावर शस्त्र बसलें अर्थात ही मूर्ति भजकास चांगली अभ्युदयकारक होणार ! अशी बहुतेकानीं खात्री होऊन चुकली.

कांहीं दिवसांनीं मूर्ति चांगली तयार झाल्यावर त्यानें ती डोंगरीस आणून भट्टजींस अर्पण केली आणि तत्संबंधानें घडलेली सर्व हकीकतही निवेदन केली. ती ऐकून भट्टजींचा कंठ प्रेमानें दाटून आला व त्यांनीं ती मूर्ति घट्ट उराशीं धरून घटकाभर तिला आनंदाश्रूंनीं अभिषेक केला व उत्तम मुहूर्तावर त्यांनीं आपल्या घरांतच तिची स्थापना केली. सांप्रत ही मूर्ति डोंगरी गांवांत भट्टजीच्या मंदिरांत आहे व तेथें नेहमीं भजन, पूजन, कीर्तन, पुराण, अन्नसंतर्पण वगैरे उत्साह होत असतात. ह्या मंदिराच्या दगदजीस प्रत्यक्ष भट्टजींच्या गुरुमहाराजांनीं ( विष्णुबोवांनीं ) देखील शारीरिक कष्टसहाय केले आहेत. तेथें भाविक लोकांस अनेक तऱ्हेचे साक्षात्कार अनुभवास येतात. भट्टजींच्या प्रेमळ भक्तिरूप तपोलबानें “दैवतांतु सान्निध्यमर्ध कस्य तपोलबात्” या न्यायानुसार तेथें उत्तम तऱ्हेचा जागृतपणा प्राप्त झाला आहे. त्यासंबंधानें बऱ्याच अनुभवी गोष्टी प्रसिद्ध आहेत; पण या लहानशा चरित्रांत त्यांचा समावेश होणें अशक्य आहे.

एकदा त्याना मारुतिरायाने ब्राम्हणरुपाने स्वप्नांत दर्शन दिले आणि सांगितलें कीं, ‘तुझ्या मुखातून नित्य रामायण श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. माझे नांव हनुमंत, मी लवकरच इकडे येणार !’ त्याप्रमाणें त्याचदिवशीं लक्ष्मण नांवाचा एक सत्वशील कुंभार भट्टजीचा अनुग्रही झाला होता त्यास ‘सांगे मुक्कामी माझी प्रतिमा अमुक ठिकाणीं भूमीत आहे ती काढून डोंगरीवर पोचीव.’ असा दृष्टांत झाला. मग लगेंच त्यांनी ती मूर्ति तेथून काढून डोंगरीवर आणून स्थापन केली. असो.

पुढें कोणत्याना कोणत्यातरी निमित्तानें गांवांत येणारे अनेक विद्वान, धनिकें, व्यापारी, कामदार, कारकून, सुशिक्षित वगैरे लोक भट्टजी महाराजांच्या कृपा प्रसादास मुद्दाम डोंगरीवर येऊं लागले. कुणि अभक्त होते ते भक्त झाले, भक्त होते ते मुमुक्षु झाले, व मुमुक्षुलोक साधक बनून आत्मसिद्धिद्वारां आपल्या जन्माचें सार्थक करूं लागले याविषयीं बरीच उदाहरणे प्रसिद्ध आहेत त्यांतील एकाचाच येथें निर्देश करितो.

प्रसिद्ध संगीत कलाभिज्न कै० अण्णासाहेब किर्लोस्कर हे ज्यावेळीं गोवेसरकारकडून इम्रजानी मिठाचा मक्ता घेतला त्यावेळीं क्राफर्डसाहेबांबरोबर पणजीस आले होते; तेव्हां भट्टजीमहाराज रामनवमीच्या उत्सवाप्रीत्यर्थ रभाशुकसंवादासारखे पौराणिक कथानकाचे नाटकप्रयोग करवीत असत. त्या नाटकाची रचना ते स्वतःच करीत व तत्संबंधीं गायन, नर्तन, अभिनय वगैरेची लहान लहान मुलांना माहिती देऊन त्याजकडून ते प्रयोग करवीत. भट्टजींची तीं नाटकें साधींच पण फार प्रेमळ होतीं. नृत्यवादनादिकांनीं युक्त असे हें नवीनच संगीतप्रयोग पाहण्याकरितां गोव्यांतील दूरदूरच्या गावाहून मंडळी मुद्दाम डोंगरीवर येत असे. हल्लीच्या नाटकाप्रमाणें पडद्याची वगैरे सीनास्नेरी मात्र त्यात नसे. बाकी सर्व कामें, भाषणे आणि पदें इतकीं कांही सरस होती कीं, त्याचें वर्णन करणे शक्य नाही. अगोदरच भट्टजींची प्रासादिक वाणी, त्यांत संगीताची उत्तम जोड, अनुपम असें नृत्य इत्यादि कारणांनीं त्यांच्या नाटकास फारच रमणीयता आली होती; त्यामुळे गोव्यात सर्वत्र त्यांची कीर्ति पसरली; तेव्हा ती त्यांची प्रेमळ व श्रुतिमनोहर नाटकें प्रत्यक्ष जाऊन पहावी अशी किर्लोस्करांनाही इच्छा उत्पन्न झाली आणि त्याप्रमाणे ते पणजींतील कांही स्नेहीमंडळींसह डोंगरीस आले, तेथील सर्व व्यवस्था, आल्यागेल्याचा उत्तम आदर-सत्कार वगैरे प्रकार पाहून त्यांना मोठे कौतुक वाटले. नंतर त्यादिवशीचा नाटकप्रयोग पाहून अण्णासाहेब अगदीं चित्राप्रमाणे तटस्थ झाले ! गोव्यासारख्या महाराष्ट्रभाषाविहीन प्रदेशात व त्यातही अगदी खेडागांवातील सामान्य प्राकृत लोकांनीं केलेल्या नाटकास असा बहारचा रंग येईल ही कल्पनाही त्यांना नव्हती ! एक एक भाग पहावा तो त्यांना आनंदाने अधिकच गहिवर येउ लागला. उघडच आहे, भट्टजीमहाराजांसारखे प्रासादिक वाणीचे साधु नाटककार, आणि किर्लोस्करांसारखे त्या कलेतील मार्मिक विद्वान प्रेक्षक, मग काय विचारावें ? “कवित्व केलें कविनायकनें । चाखोनि घ्यावा रस पंडिताने ॥” असं झालें म्हणून यांत मोठेंसें नवल नाहीं !!

अखेरपर्यंत प्रयोग पाहिल्यावर अण्णासाहेब भट्टजींस नमस्कार करून म्हणाले ‘आपण ही नाटक कंपनी घेऊन पुण्या मुबईकडे एकदां फेरी मारा. म्हणजे आपल्या श्रमाचें चांगले वीज होऊन चार पैसेही मिळतील.’ हें ऐकून भट्टजीमहाराजांना ती एक मौजच वाटली ! पण अण्णासाहेबांची रसिकता व प्रेम ही अंतरीं जाणून त्याच्या भाषणाचा निषेध न करितां ते म्हणाले ‘या नाटकाचा हेतु पैसे मिळविण्याचा नसून फक्त अज्ञलोकांत भक्ति व ज्ञान, याची आवड उत्पन्न होईल अशा भगवद्नुवादात्मक लीला दाखवून त्यांच्या सत्वशुद्धीस साहाय्य करावें, असा आहे. इतक्यासाठीं आपली विनंति मान्य करवत नाही.’ याप्रमाणे भट्टजींनीं आपल्या शीलास व योग्यतेस साजेसेंच उत्तर दिलें. पण त्यामुळे अण्णासाहेब मात्र निराश झाले. या मन्वंतरांत अशारीतीने घरीं चालत आलेल्या लक्ष्मीशीं इतका उदासीन पुरुष त्यांनीं क्वचितच पाहिला होता. त्यातही प्रपंचाविषयीं अगदीं विरक्त झालेल्या साधुपुरुषाची गोष्ट निराळी पण भट्टजींसारखे कुटुंबवत्सल आणि गद्यपद्य कविताशक्ति व तालसुरादि संगीत विद्या अंगीं असणारे हरिभक्तिपरायण पुरुष धनप्राप्तीविषयीं इतके निरिच्छ असलेले पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलें आणि अखेरीस ‘तीं नाटकें तरी आपणास द्या म्हणजे आपण मंडळी तयार करून होईल त्या प्राप्तीमधून येथें श्रीरामचरणाची सेवा करूं’ असें त्यांनी भट्टजींस सांगितलें. पण त्यावेळीं तीं नाटकें एकत्र चोपडींत लिहिलेलीं नसल्यामुळें अण्णांची तीही इच्छापूर्ण झाली नाही. व त्या नाटकांवर मिळालेल्या द्रव्याने श्रीरामरायाची सेवा करून घेण्याविषयीं त्याची मनोदेवता त्यास सांगेना. अशा स्थितींत शेवटी अण्णांनी ‘निदान आपल्या हातचा कांहीतरी मला प्रसाद द्या म्हणजे श्रीरामकृपेने व आपल्या कृपादृष्टीने जी येथें मला स्फूर्ति झाली आहे तिच्या योगाने मी अशाच धर्तीवर कांही नाटकें लिहून मायभाषेची आणि देशबांधवांची सेवा करीन.’ म्हणून भट्टजींची विनंति केली. त्याप्रमाणें भट्टजीमहाराजांनीं त्यांना श्रीराममंदिरातील चांफ्यावर नेउन व श्रीचरणीं मनःपूर्वक प्रार्थना करून श्रीफलासह पुष्पप्रसाद आपल्या हस्तांनीं अण्णांच्या पदगत घातला. आणि श्रीरामकृपेने तुमचे सर्व हेतु सिद्धीस जातील असा अंतःकरणपूर्वक आशीर्वाद दिला. तदनुरूप पुढें अण्णांचा नाट्यकलेंत जो लौकिक झाला तो जगद्विख्यात आहेच. सारांश, किर्लोस्करांची कल्पनावधु, नाटकें व आख्याने कुठेही प्रसवलेली असो. पण तिचें पाणिग्रहण व गर्भाधान विधि गोमांतकप्रांतीं डोंगरी येथील श्रीराममंदिरातच झालें होते ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. जगात असामान्य यशःश्री किंवा नावलौकिक मिळविण्यास व सर्व लोकाचा अतुल प्रेमभाव संपादण्यास केवळ बौद्धिक सामर्थ्याहून निराळे असे भगवंताच्या अधिष्ठानाचें किंवा साधुसंताच्या अमोघ आशीर्वादाचें पाठबळच मुख्यतः असावें लागतें. या सर्वमान्य सिद्धांताचे सत्यत्व ह्या उपरि निर्दिष्ट किर्लोस्करांच्या गोष्टींत पूर्णपणे दिसून येते.

भट्टजीमहाराजांनीं पंढरपूर, नाशिकपंचवटी, अयोध्या, काशी, त्रिपती, हंपिविruपक्ष, वगैरे बऱ्याच तीर्थयात्रा केल्या. ते पंढरपुरास सतत चातुर्मास राहिले होते. तेथून घरीं आल्यावर त्यांनीं श्रीरामासंनिध भजनी सप्ताह सुरू केला. त्यावेळीं बोरी येथील प्रसिद्ध महंत जगन्नाथबोवा हे भट्टजीमहाराजांच्या अत्यंत स्नेहामुळें वारंवार डोंगरीवर येत असत. त्यांस ती भट्टजीमहाराजांची अपूर्व भजन पद्धति व तो अनिर्वचनीय सात्विक प्रेमरंग पाहून पराकाष्ठेचा आनंद होई. जगन्नाथबोवा भट्टजीमहाराजांस गुरुस्थानीं मानीत असत व आपणांस कांहीतरी सेवा सांगावी म्हणून ते सद्गदित भट्टजींस विनंती करीत. पण त्यांस भट्टजींनीं भजनीसप्ताहाचा सर्वत्र प्रसार करावा. म्हणजे हीच आपली सेवा असे सांगितलें. तेव्हांपासून जगन्नाथबोवांनीं सर्व गोमांतकभर फिरून इकडे तिकडे भजनीसप्ताह सुरू केलें ते अजूनही सर्वत्र अव्याहत चालू आहेत. त्यांनीं देवमामलदार, सिद्धारूढस्वामीप्रभृति अनेक साधुसंतांची दर्शनें घेतलीं होतीं. जगन्नाथबोवांवर भट्टजीमहाराजांचे खालील पद प्रसिद्ध आहे.

धन्य धन्य अवताराच केवळ जगन्नाथ दासाचा । ज्ञानभक्ति वैराग्यबिराजित जगदोद्धारक साचा ॥ ध्रु० ॥ 

पतीतापावन व्हाया देशोदेशीं वास जयांचा । जिकडे तिकडे थाट चालविति कीर्तन सप्ताहांचा ॥ १ ॥ 

निरहंकारी प्रेमळभारी स्वभाव शांत मनाचा । इंद्रियनिग्रह बळकट जैसा परिसों योगि शुकाचा ॥ २ ॥ 

नरनारी आबाल वृद्ध यां जिवलग होय जिवाचा ॥ निंदास्तुतिसम अद्वयभावें भोक्ता भजन-सुखाचा ॥ ३ ॥ 

कोणी कांहीं ह्मणो आवडता कृष्ण जगन्नाथाचा ॥ भला भला सत्पुरुष लाभला पुतळा भक्ति-रसाचा ॥ ४ ॥ 

या वरील पद्यांतील विवेचनावरून भट्टजींनीं भजनाचा गोव्यांत केवढा विस्तार केला हे सहज कळण्यासारखें आहे. केवळ कांहीं छिद्रान्वेषण दृष्टीच्या मंडळींनीं त्यांचा पुष्कळ छळ व दुर्लौकिक करण्याचा प्रयत्न केला ! परंतु “ मणिःशाणोल्लीष्टः ” या न्यायाने भट्टजीमहाराजांचें त्यापासून कांहींच नुकसान न होतां उलट त्यांच्या निर्मल कीर्तीचा दूरवर विस्तार मात्र बराच झाला ! त्यांच्या दर्शनास दूरदूरच्या प्रांतांतून अनेक सद्भक्त येऊन त्यांच्या अमोघ वाणींतून निघालेला उपदेश श्रवण करीत असत. त्यांचें भक्तिप्रचुर भजन ऐकले म्हणजे कोणाही पाषाणहृदयी मनुष्याचें अंतःकरण प्रेमानें सद्गदित झाल्यावांचून राहत नसे. एकदां भट्टजीमहाराजांचा कट्टा निंदक असा एक श्रीमंत गृहस्थ सहज त्याच्या भजनास पोंचला असतां भट्टजीनी त्याच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू लोटविले व त्यानेंही निरभिमानपणे भट्टजीचे पायी लोटांगण घालून क्षमा मागितली !

ते शुद्ध ज्ञानमार्गोपदेशक व प्रेमळ भजनरगाची केवळ प्रतिभाच होते. त्यांचे भजन म्हणजे “ घोंटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं ” अशांपैकीच होतें. श्रीमंतापासून तों अगदीं अकिंचनापर्यंत, ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत त्यांनीं उच्चनीच भेदभाव सोडून सर्वत्र ज्ञानमार्गाचा सारखा प्रसार केला व बहुतेकाचे अज्ञान दूर करून त्याच्या हृदयांत ज्ञानाचा पूर्ण प्रकाश पाडिला. त्यांचे कोंकण्या भाषेत नेहमी असे सांगणे असे की, ( १ ) जें जाय तें मिळना, ( २ ) नाका ते सुदना, ( ३ ) करचें ते करूंक जाय, ( ४ ) घडूंक जाय ते घडलें ( ५ ) जाणचें ते जाणूक जाय. अशी ही पंचमहावाक्यें त्याच्या तोंडून काही निमित्तानें वेळोवेळीं बाहेर पडत. त्याचा अर्थ अनुक्रमे असा की, ( १ ) जीवास जेव्हा जे पाहिजे असते तेव्हा ते मिळतेंच असे नाही. ( २ ) किंवा जे नको असते ते टळतच असेंही नाही ( पण यामुळे हर्षविषाद न मानिता वर्णाश्रमधर्मोचित असें ) ( ३ ) कर्तव्य म्हणून जे ठरेल तें केलेच पाहिजे. परिणामाकडे लक्ष्य देऊन व्यग्रचित्त न होता भगवदर्पणबुद्धीनें प्रत्येक उपस्थित कर्म बजवावे, मग भगवंताच्या इच्छेनें ( ४ ) जे घडावयाचें ते घडणारच आणि जें कांहीं घडणार तें आपणास क्वचित्काळीं मनांविरुद्ध दिसते तरी ते आपल्या भावी हितासाठीं असतें असें समजावे कारण आमच्या मूळ शुद्ध कामनारहित हेतुप्रमाणे त्या कर्मफलाची योजना सर्वज्ञ व कृपाळू अशा भगवंताकडून झालेली असते. ती योजना आमच्या अकल्याणाविषयीं केव्हाच असणार नाही हे मुख्य तात्पर्य सर्व गोष्टींतून ( ५ ) जाणावयाचें तें जाणले पाहिजे. मुख्य ध्येय जे आत्मतत्व किंवा भगवत्स्वरूप तेच प्रत्येक कर्मात व कर्मातीं जाणले पाहिजे. प्राप्तव्य, ज्ञातव्य, गेतव्य, जें आहे त्याचें मुख्य अधिष्ठान आत्मस्वरूप होय. त्यात स्थिर राहून सर्व कर्मे निरहंकारबुद्धीनें आचरली पाहिजेत. हाच खरा कर्मयोग, व पुरा भक्तियोग, आणि हाच शुद्ध ज्ञानयोग होय. व्याव्रहारिक किंवा पारमार्थिक भाग्योदय झाला पाहिजे तर प्रत्येकाने आपली तपःसंपत्ती वाढविण्याविषयीं व असलेली कमी न होऊं देण्याविषयीं फार जपलें पाहिजे. चांगले नशीब अथवा प्रारब्ध म्हणून जे ह्मणतात ते अदृश्य असें तपःसंपत्तीचे कार्य होय. असें भट्टजी ह्मणत. आणि परमेश्वर हा सर्व सुखाचें उगमस्थान असल्यामुळें त्याच्या भक्तिरूप तपाकडेच सर्वांनी लक्ष्य द्यावें. स्ववर्णाश्रम धर्मोचित कर्मसुमनांनीं सर्वोतर्यामी परमात्म्याची पूजा करावी असें ते सांगत. “ निद्रेमाजि जसा निवृत्त असशी जागेपणी होतसा ” अशी त्यांची सूचना असे. “ समजानू आसतकूच झाले ” असेंही ते आपल्या घरगुति कोकणी भाषेनें प्रत्येक पृच्छकास सांगत. म्हणजे ‘ समजून असावें, कर्म निराळें, इंद्रियें निराळीं, व मी आत्मा म्हणजे या सर्वांचा द्रष्टा होय. असें समजून अलिप्त साक्षित्त्वरूपानें जागृत असावें व कर्मे करावी. कर्मास भिएं ह्मणजे आपली आपण योग्यता विसरणे होय. कर्तव्यरत असून असंग असणें हीच खरी विश्रांति असे ते सांगत. प्रसिद्ध स्वामी रामतीर्थही याविषयीं असेंच म्हणतात.—

“ What is work ? Intense work, according to Vedant, is rest. All true work is rest, that is what Vedant preaches. Vedant wants you to rise above the little self, the small age through intense work. ”

सुख व निर्विषय आनंद हेंच भगवंताचे खरे स्वरूप आहे अशाबद्दल व त्या आनंदघन भगवंताच्या अवतारकृत्यांबद्दल भट्टजीमहाराज फार खुबीदार व्याख्यानें देत असत. आसइष्ट, सोयरधायरे, कुत्रींमांजरें, कीडमुंगी इत्यादि सर्व भूतमात्रांचे ठिकाणीं आपणास सुख व्हावें अशी स्वभावसिद्ध वसत असणारी इच्छा, त्यांतच ईश्वराचें खरें वास्तव्य आहे अतएव तीच खरी अयोध्या, काशी व पंढरी समजून सर्वांवर उत्कट प्रेम करणें हीच खरी ईश्वरोपासना होय, असें ते बोलत. उघडच आहे, अर्जुनाने देखील भगवंतास त्याच्या मुख्य मुख्य विभूति विचारल्या तेव्हां आपली पहिली विभूति देवानें त्यास वरीलप्रमाणेच सांगितली आहे व “ अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ” ही भगवदुक्ति प्रसिद्धच आहे. सर्वभूतहितेरत होण्याबद्दल देवानें भक्तांस बजावून सांगितलें आहे.

वस्तुतः परोपकार हीच खरी ईश्वरभक्ति होय. प्रपंचांत कारणपरत्वें लहान-मोठ्या माणसांचा आशय म्हणजे हेतु आपणास यथाशक्ति पूर्ण करितां येतो आणि यामुळे परस्पर आनंद व प्रेम उत्पन्न करणे हाच भगवंताची आराधना आहे. कारण तो तत्त्वरूप आहे; म्हणून भूतमात्रांची सेवा करण्याबद्दल संतांचा आग्रह असतो. ‘ जें जें देखे भूत तें तें मानी भगवंत ’ या एकनाथी वचनांत परोपकाराचें सकारण रहस्य आहे. ‘पर’ ह्मणजे मन बुध्यातीत जो परमात्मा त्यास ‘उप’ ह्मणजे जवळ करण्याचा जो उद्योग तो ( पर+उप+कार ) परोपकार होय. तात्पर्य संसारांत राहूनच भगवदाराधनेचें अनुसंधान न तुटूं देतां हा भवार्णव उल्लंघितां येतो असें भट्टजी ह्मणत, आणि याच दृष्टीनें ते भूतमात्रांच्या ठिकाणीं अत्यंत प्रेमदृष्टि ठेवीत. लोकांवर प्रेम वाढतां वाढतां अहंभाव आपोआप लुप्त होतो, आणि प्रेम-स्वरूप भगवंताशीं भेट होऊन अकृत्रिम प्रेमपूर्वक लोकसेवेच्या छंदानें इतर साध-नांनीं कष्टसाध्य असा याचा आत्मविकास होतो; कारण—

1 God is love in essence. 2 Love is God in solution. 3 Service is love in action.

“ देव ह्मणजे प्रेमाचें घनीभूत स्वरूप अथवा अर्क होय. प्रेम ह्मणजे देवाचें द्रवीभूत स्वरूप होय, आणि परोपकार ह्मणजे प्रेमाचें कार्य किंवा आचरणांत आलेलें प्रेम होय. ”

या वरील तीन वचनांत ईश्वरस्वरूपाचे व त्याच्या भक्तीचें आणि प्राप्तीचें फारच थोड्या शब्दांत उत्तम विवेचन एका लेखकानें केलें आहे; आणि सुदैवाची गोष्ट ही कीं, पुष्कळ अमेरिकन समंजस तत्ववेत्ते लोकही हें तत्त्व आतां फारच आस्थेनें जाणवावयास लागले असून ज्याला त्याला “ EXCHANGE LOVE and SERVICE ” याच वाक्याची म्हणजे भूतमात्रीं प्रेम करून एकमेकांची सेवा करण्याची आठवण देत आहेत. वास्तविक भूतमात्री भगवद्भाव धरणे हाच ‘ निश्चित भक्तियोग ’ होय. अशाबद्दल साधुसंतांचेही अनेक पुरावे मिळतील; पण अशा या भक्तियोगावांचून योगयागादि कोणताही उपाय अगर तत्वज्ञान धार्मिक ह्मणतां येणार नाहीं व त्याव्यतिरिक्त कोणतेंही कर्म हरिप्राप्ति करून देण्यास समर्थ होणार नाहीं, अशी भट्टजीमहाराजांची विवेचनपद्धति असे; आणि—

If religion means the art of acquiring God a philosophy, which is not based upon Bhakti, can never be to be religious.

असेंच त्यांचेंही ह्मणणें असे. कोणत्याही परिस्थितींने आपली आनंदवृत्ति भंगूं न देतां नित्यसुखस्वरूप जो रामराय त्याचे चरणीं रत असा म्हणजे झालें; असें त्यांचें सांगणें असे. अशारीतीनें त्यांनीं भगवंताच्या यथार्थ ज्ञानाचा विस्तार करून शके १८२४ शुभकृत् संवत्सरांतील आश्विन महिन्यांत या नश्वर भूतलावर आपला पुण्यदेह ठेवून परलोकीं गमन केलें !

देह ठेवण्यापूर्वी त्यांनीं सर्व गांवातील सद्भक्तास आपणाजवळ बोलाधून आणून दोन तीन तास त्यांस सदुपदेश केला व रामभजनाचें माहात्म्य मोठ्या कळ-कळीनें समजावून दिलें, आणि आपणावर जसे प्रेम ठेविलें तसेंच आतां माझा मुलगा मुकुंदराज यावरही ठेवा असें सांगितलें. आपण अमुक दिवशीं निर्वाण कर-णार असें त्यांनीं पूर्वीच सांगितलें होतें. कोजागरी पौर्णिमेचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर ते म्हणाले ‘आतां अवधी नाही; कारण पुढें दीपवाळीच्या उत्स-वास अवघे तेरा दिवस राहिले. आमचें और्ध्वदैहिक वगैरे होऊन दीपवाळींतील श्रीरामरायाचा मिरवणुकीचा उत्सवही तसाच निर्विघ्नपणे झाला पाहिजे. ” भगव-द्भक्त महानुभाव देह ठेवण्याच्यावेळीं मृत्यूकडे शेवटचें म्हणून अत्यंत संस्मरणीय भाषण करितात त्याप्रमाणे भट्टजींचीही अखेरचे भाषण त्यावेळी हजर असलेल्या मंडळीस ऐकण्यास मिळाले.

या भगवद्भक्ताच्या निधनानंतर बहुतेकास अनावर दुःख झाले. विशेषतः त्यांच्या भक्तमंडळीस त्यांच्या परिणामकारक सदुपदेशाचें स्मरण होऊन फारच दुःख झालें. अशारीतीनें भक्तिज्ञान वैराग्यरूप तेजोमय किरणाचा सर्वत्र विस्तार व प्रकाश करून अज्ञानाधकारास देशोधडीस लावणाऱ्या या सत्पुरुषरूप सूर्याचा अकल्पित अस्त झाला. निर्वाणकालीं त्यांचे वय ५८ वर्षांचें होतें.

येथपर्यंत भट्टजीमहाराजांच्या जीवनक्रमांतील ठळक ठळक गोष्टी सांगितल्या. आतां त्याच्या कवितेकडे वळूं.

भट्टजीमहाराज हे स्वतः उत्तम कवि होते. त्यांची कविता सरळ, सुबोध व सद्य: परिणामकारक अशी आहे. त्यांनीं केलेला ‘ स्वात्मतत्त्वामृतशतक ’ नामक ग्रंथ म्हणजे वेदांताचा केवळ गर्भ असें म्हटलें तरी चालेल. यांतील विषयविवेचन-पद्धती इतकी सोपी आहे कीं, तो एखाद्या लहान मुलास देखील सहज समजेल. वेदांत ग्रंथांत वारंवार आढळणाऱ्या पारिभाषिक शब्दांची भानगड यांत मुळींच नसल्यामुळें कोणाही मुमुक्षूस या ग्रंथाच्या अभ्यासानें दुर्निवार अशा मोहाचा निरास करितां येईल. हें खालीं दिलेल्या वेच्यांवरून चांगले व्यक्त होईल. आपण वस्तुतः आनंदस्वरूप असून आपणास एकदम कसा भ्रम होतो त्याविषयीं भट्टजी म्हणतात.

श्लोक.

“ आनंद आपण असें नकळे मनांतें । घेऊनि विस्मृति घरी विषयासि नातें ॥ 

कीं होय सौख्य तुज तें विषयांत आहे । वाटे उगा भ्रम तुझा तुज बाधताहे ॥ १२ ॥ 

विषय कल्पुनि जें सुख भोगिसी । स्वरूप तेंचि तुझें परि नेणसी ॥ 

ह्मणूनि दुःख अनावर वाटलें । तुजवरीच तुझें तम दाटलें ॥ १३ ॥ ”

या वरील दोनच श्लोकांवरून भट्टजींची कविता किती सुबोध व सोपी आहे याची वाचकांस सहज कल्पना होईल. आपलें खरें स्वरूप कोणतें तें सांगतात.

“ न दृश्य तूं साक्षि असे तयाचा । मागेंपुढें भास दिसे मनाचा ॥ 

सर्वांसि या आपण मूळ साचा । अलक्ष सवित्वसुख लक्षणाचा ३२ ”

अशा अलक्ष परब्रम्हाचा अभ्यास करतेवेळीं तुला हें दृश्य आडवें येईल तेव्हां, ह्यासून जावून तूं या दृश्याचा त्याग करण्याची खटपट करूं नकोस; तर:—

“ दिसे तें तूं पाहे परि वळख द्रष्ट्यासि वळुनी । असे जो सत्यत्वें सुखमय सदा वृत्ति त्यजुनी ॥ 

दिसे भासे सारें तुजवरिच हें तूं न दिससी । तुला तूं लक्षाया सहज समजानेंचि अससी ॥ ३३ ॥ ”

वेदांतासारखा गहन विषय बोलतांना भट्टजींच्या भाषणांत एक देखील कठीण शब्द येत नसे. ‘ आत्मा ’ हा शब्द संस्कृत आहे; पण अज्ञलोक त्याचा विपरीत अर्थ कल्पितील म्हणून ‘ आत्मा ’ म्हणण्याऐवजीं ते ‘ आपण ’ असेंच म्हणत असत. यावरून त्यांची वेदांतविवेचनपद्धति किती सुगम होती हें सहज समजण्यासारखें आहे व याचा प्रत्यय पाहणें असेल तर त्यांचे वरील उद्गार किती सोपे व सरळ आहेत तें पहावे.

“ सुखाची जे इच्छा त्यजुनि वळ मागें परतुनी । स्थिरत्वानें राही सुखमय निजात्मा समजुनी ॥ 

उठों नेदी वृत्ती सहज सुख येईल उदया । तदाकारें घोंटी स्फुरत सुख जें आपण तया ॥ ”

अहाहा ! किती सहज व गोड उद्गार हे ! संसाररोगग्रस्त मुमुक्षुजीवास वरील श्लोक ही दिव्य मात्राच होय.

“ When shall I be free ? When I shall cease to be. ”

असं स्वामी रामतीर्थांनीही म्हटलें आहे. आतां विषयांपासूनच खरें सुख प्राप्त होते असे जर कोणास वाटत असेल तर त्यांनीं खालील श्लोक पहावा.

“ पदार्था सुखसा तुला जरि दिसे सुषुप्ता पहा । अपार सुख निद्रिता, न विषयीं जिवाची स्पृहा ॥ 

प्रपंचसुख हा जरी तरि निजेंत कैंचें सुख । न तें विषयवृत्ति, जागृतींत जे दिसे सन्मुख ॥ ७६ ॥ ”

याप्रमाणे ‘ स्वामतत्त्वामृतांतील ’ प्रत्येक श्लोक वाचनीय असल्यामुळे त्यांतील वेंचे ह्मणून निराळे देतां येत नाहीत. आतां त्यांतील आणखी एकच श्लोक देऊन भट्टजीमहाराजांच्या इतर कवितेकडे वळूं.

विषयांपासून चित्ताची निवृत्ति करून आत्मस्वरूपांत स्थिर केल्यावर आपली स्थिति कशी होते तें सांगतात:—

“ जें वासना वळविसी स्वसुखेक ठाया । वाटेल त्यां कठीण तेथुनियां उठाया ॥ 

जें तें स्फुरेल सुख आपण विश्व सारें । दुःख न राहतिल या निज सद्विचारें ॥ ७८ ॥ ”

भट्टजीमहाराज स्वतः चांगले गायक असल्यामुळे त्यांनीं अनेक रागरागिणीवर सुंदर पर्दे केलीं आहेत. भगवद्भक्तिविरहित जे गाणे ते त्यांस अगदी आवडत नसे. ते कीर्तनांत देखील विश्रांतीसाठीं ह्मणून अप्रासंगिक हिंदुस्थानी पदे, ठुमऱ्या वगैरे म्हणत नसत. कोणतीही कविता भगवद्गुणवर्णनपर किंवा ज्ञानवैराग्यपर असावी असें त्यांचें मत होतें. त्यांचे चिरंजीव मुकुंदराज हे अगदीं लहान असतांना त्यांची मातोश्री त्यांस खेळविण्याकरितां म्हणून कसलें तरी गीत म्हणत असे. तें भट्टजी-महाराजांना न आवडून मुद्दाम त्यांनीं खालील रसभरीत पद तयार करून त्यांस म्हणावयास दिलें.

पद—( गुरुकृपांजन पायो मेरे भाई० या चालीवर. )

“ मुकुंद राजा ! तूं प्रिय माझा, लावी देह तुझा रामभक्तिकाजा ॥ धृ० ॥ नवविधा भक्ति करि राघवाची । रामासन्मुख नित्य दास-बोध वाची ॥ १ ॥ विवरुनि अर्था साधी परमार्था । निशिदिनीं भज तूं रामसमर्था ॥ २ ॥ तुझा आईबाप रामसीतापती । ओळखि घे त्याची साधूंचे संगती ॥ ३ ॥ तरीच वंशाचा होईल उद्धार । विष्णु कृष्ण जगन्नाथा आवडसि फार ॥ ४ ॥ ”

अशारीतीनें परमेश्वरभक्त मुलगा निपजावा म्हणून इच्छा करणारे आईबाप आमच्या या भरतभूमीवर कितीसे निघतील याचा वाचकांनींच विचार करावा. फार तर आपला मुलगा चांगला सुशिक्षित पदवीधर व्हावा, डॉक्टर व्हावा, वकील व्हावा, सरकारी मोठी नोकरी त्यास मिळावी, किंवा मोठा व्यापारी व्हावा अशीच इच्छा बहुतेकांची असते; तेव्हां भट्टजीमहाराजांच्या वरील गोड शब्दांची तारीफ करावी, कीं त्यांच्या या बहुमोल सल्ल्याची शिफारस करावी हेंच आम्हांस समजत नाहीं. विशेषतः आम्हांस लिहिण्यास आनंद वाटतो कीं, त्यांच्या पवित्र वासनेप्रमाणेंच त्यांचे चिरंजीव मुकुंदराजही श्रीरामरायाची एकनिष्ठ भक्ति करून त्यासन्मुख दासबोध वाचणारे व त्याच्या अर्थाचें विवरण करून आपल्या वंशाचाच काय पण जगाचाही उद्धार करणारे निपजले आहेत. असो.

भट्टजीमहाराजांची रामदास, तुकाराम, वामनपंडीत वगैरे साधुसंतांच्या ग्रंथांवर फार भक्ति होती. त्यांनीं केलेल्या बहुतेक पदांची चाल अमुक अशी मुळींच देतां येत नाहीं. त्यांची खरी धाटी ठाऊक नसलेल्यांकडून तीं पदें ऐकलीं म्हणजे अगदीं गबाळ वाटतात; पण तींच तज्ञांच्या मुखांतून ऐकलीं ह्मणजे वृत्ति अगदीं तन्मय करून सोडतात. त्यांपैकीं एक दोन निवडक पदें येथें देतों:—

पद—( कितना हमालले, थमाल आयुष्या गाईं. या चा० )

“ रामा ! दयाघना ! क्षमा करुनि मज पाहीं । जरि बहु अपराधी खराच मी अन्यायी ॥ 

तुजविण पाहतांरे ! संसारीं सुख नाही, निमिषभर कांहीं ॥ धृ० ॥ 

कोठिल कोण मी न जाणिला हा पत्ता । आजवरि अज्ञानें मिरविली विद्वत्ता ॥ 

देहात्मत्वाची स्थिति झाली उन्मत्ता । येउनि जन्मारे ! व्यर्थ श्रमविली आई, हेंचि मर्नि खाई ॥ रा० ॥ १ ॥

नाथ अनाथ तूं मायबाप ही तैसा । परी मी उद्भवलों प्रतीत पापी पेसा ॥ 

तरि निजनामाचें महत्त्व सांडिसि कैसा पावन नामारे ! जाच देति रिपुसाही, साचवपुदाही ॥ रा० ॥ २ ॥ 

करुणासागरा ! राघवा ! रघुराजा । विषयीं पांगला नका करू जीव माझा ॥ 

भजनी चांगला मिळवीं साधुसमाजा । भुलुनि प्रपंचारे ! भ्रमुनि भ्रमुनि ठायीं ठायीं हरुनि वय जाई ॥ रा० ॥ ३ ॥ 

सच्चित्सुख जो तूं परब्रह्म केवळ । विश्वीं व्यापला तरगीं जैसें जळ ॥ 

अघतरतोसि हें उपासकांचें बळ । भक्त जनलारे ! चित्रविचित्र उपायीं सतत सुखदायी ॥ रा० ॥ ४ ॥ विष्णु ! कृष्ण ! जगन्नाथ ! तुझा मी लेक । चरणीं शरण; दे स्मरण आपुलें एक ॥ 

हातीं सताची सेवा घडवी अनेक । जगदभिरा मारे ! मानस हें तव पायीं, जडविं लवलाहीं ॥ रा० ॥ ५ ”


भट्टजीमहाराजांचें खालील वैराग्योत्पादक पद किती सरस आहे पहा:—

पद—( अखंड हरि हरि वदोरे बापानो. या चा० )

         सदैव राम राम ह्मणारे बापानो । सदैव राम राम ह्मणा ॥ 

          नरतनु हे दुर्लभ गणारे बापानों । सदैव राम० ॥ धृ० ॥ 

तुह्मि प्रपंच केला जरि निका । तरि शेवटीं होईल हा फिका ॥ 

यम काढिल शोधुनि बहु चुका । मारमारिल कठिण आइकारे बापानों । सदैव राम० ॥ १ ॥ 

काय घालवितां वय फुका । ध्यानि आठवा रघुनायका ॥ 

ब्रह्यत्वें आपणा तुका । जन्ममरणाला मग मुकारे बापानो । सदैव राम० ॥ २ ॥ 

देह पडेल कधिं न भरंवसा । निज आत्मा आपुला कसा ॥ 

हें जाणत एकांतीं बसा । न कळे तरि गुरुला पुसारे बापानो । सदैव राम० ॥ ३ ॥ 

मोठेपणिचा अभिमान सोडा । छी ! छी ! देहमीपणा खोडा ॥ 

दृढ असंगशस्त्रें तोडा । आहे अखंड सुख तें जोडारे बापानो । सदैव राम० ॥ ४ ॥ 

जगीं तारक वैष्णव गुरु । त्यांचे चरण जाउनि दृढ धरूं ॥ 

कृष्ण जगन्नाथ सांगे उद्धरूं । आपआपणा सावध करूंरे बापानो । सदैव राम० ॥ ५ ॥


गोमांतकांत बहुतेकठिकाणीं देवाचा उत्सव झाला म्हणजे त्याच्या सांगतेच्यावेळीं गौळणकाला म्हणून करीत असतात. गौळणकाला म्हणजे भगवान श्रीकृष्णानीं गोकुळांत केलेल्या लीलाविहाराचें दृश्य वर्णन होय. हे गौळणकाले अनेक कवींनीं नाटकरूपानें तयार केले असून त्यांनीं आपल्या स्वभावास अनुसरून ते शृंगार-शाखाची मूर्तिमंत प्रतिमाच बनविले आहेत ज्या श्रीहरीच्या चरित्रश्रवणानें तत्काल भवबंध तुटून परमपदाची प्राप्ति होते त्या मंगलकारक चरित्राचा असा हेतुविपर्यास झालेला पाहून भट्टजीमहाराजांस फार वाईट वाटलें व त्यांनीं उत्तम असे दोन गौळणकाले तयार केले. त्यांतील पदें पाहिलीं म्हणजे कर्त्याच्या विलक्षण चातुर्या बद्दल तारीफ करावी तेवढी थोडीच वाटते. कारण त्या कालांनीं विषयासक्तांची व विरक्तजनांची सारखीच करमणूक होते. कल्पनेचा साक्षी जो चैतन्यघन आत्मा तो श्रीकृष्ण, विवेक वैराग्यरूप आत्मसखे ते गोपाळ, सकल इंद्रिय-वृत्ति ह्या गोपिका, व शुद्धसत्वात्मक ज्ञानमायारूप जी तुर्या किंवा निवृत्ति ती यशोदा, शुद्ध निर्विकल्प असे आत्मसुख तें दही, दूध, लोणी, वगैरे होय. अशी योजना त्यांत केलेली आहे. त्यांपैकी थोडासा मासला:—

“ गोकुळांत तु अशा नानाप्रकारच्या खोड्या करून गोपिकांस व्यर्थ कां त्रास देतोस ? ” असें यशोदेनें विचारल्यावरून भगवान तिला सांगतात:—

पद. ( मलय गन्धरी अद्भुत शोभा पाहुनियां शबरी० या चा. )

निर्विकल्प सच्चिदानंद मी नेणती या मातें । केवळ जडतनु शाश्वत मानुनि कल्पिति कामातें ॥ धृ० ॥ मन्मूर्तिवर बळकट प्रेमें लंपट मन करिती । विषयदृष्टिनें दिननिशि हा आकार हृदयीं धरिती ॥ दृश्य चराचर चिन्मय ऐसी वृत्ति न तिळभरि ती । आत्मसुखास्तव आळविती बहु मज निष्कामात्रें ॥ निर्वि० ॥ १ ॥ यद्यपि चिद्धन तो मी या अबलांसि नसे ठावा । केवळ सगुणी पूर्ण ज्यांही धरिलें सद्भावा ॥ जाणुनि मी अवतारि हांच मद्भक्तांच्या गांवा । माया अही सहज घडे हा स्फुरण धर्म मातें ॥ निर्वि० ॥ २ ॥ अवस्था त्रयातीत हरिन नवनीत कसा यांचें । जैसा तसा असतांचि स्फूर्तिरुप जग नटलों साचें ॥ तंतूपट मृदूघट दृष्टांतें कारण कार्याचें । कर्ता कृष्ण जगन्नाथ नसुनि घे मी नामातें ॥ निर्वि० ॥ ३ ॥

या एकाच पदावरून भट्टजींची कवित्वशक्ति, चातुर्य, अनुप्रास व अर्थगौरव वगैरे गोष्टींची वाचकांस सहज कल्पना होणार आहे !

याप्रमाणें भट्टजीमहाराजांनीं केलेलीं एकंदर पर्दे सुमारे आठशेवर होतील. त्या-शिवाय ‘ स्वामतत्त्वामृत, मानपूजा ’ हे दोन लहानसे वेदांताचे ग्रंथ आणि 'शुकभासंवाद, लोपामुद्रासंवाद. नटसुभद्राविलास व अहिल्योद्धार' अशीं चार संगीत नाटकें तयार केलीं आहेत. त्यांतील एकच 'अहिल्योद्धार' तूर्त उपलब्ध असून बाकीचीं नामशेष झालीं ? त्यांनीं आनंदरामायणांतील कांहीं भागावर कीर्तना-करितां सुरस आख्यानें करून ठेविलीं आहेत तीं येणेंप्रमाणें:—

"व्यासावरदान, शतस्त्रीणांवरदान, तुलसीपत्रसधान, हास्यमुक्ति, यागकांड, यात्राकांड, चंपिकासुमतिस्वयंवर, यूपकेतुस्वयंवर, पिंगलाख्यान, दुर्वासभोजन, नागरिकोपदेश, सगुणाख्यान, गुणवत्याख्यान."

याशिवाय त्यांनीं केलेले अभंग व कोंकणीभाषेतील काही स्फुटश्लोक वगैरे बरेच आहेत. त्यांना मोरोपंताप्रमाणें चित्र काव्याचाही फार नाद होता. नमुन्यासाठीं एक अष्टक येथे देऊन या चरित्राची समाप्ति करूं.

" रातपरश्रीपति रामभू दीं रमे त्या सुख दे अमू ॥ 

राबर व्यापक चित्स्वरू रेश भक्तांस्तव जो सरू ॥१॥

ती रं वधी शोधुनिया अरा तीती व्रें गुणें सज्जन पक्षपा ती ॥ 

ती नीं गुणीं लिप्तनयप्रभा तीती थपर्वें यद्गुण साधु गा ती ॥२॥

रूप ये नाम जरी मुखांत । लीन होतो जीव यत्सुखां ॥ 

रात्रया यत्न असा भयांत । थापि जाती जन रौरवां ॥३॥

पा पे स्मरू त्या जरि मायबा पापा हे प्रयत्नें हरुनी त्रिता पा ॥ 

पा ळी कृपें ओढुनि आत्मचा पापा पां न ठेवी भजु त्या रमा पा ॥४॥

  रिष्ठ जो एकचि रामदे रीन मी त्या हृदयीं सदै ॥ 

दे न तन्नाम अबद्धमे सन देऊन तयासिखें ॥५॥

स्तो रामासृद्या समा रां सुरांमाजि जगन्निधा ॥ 

ज्या रूप न होय मा मुनि ज्या वेति समस्त मा ॥६॥

रा त्रिंचरा देउनि तीव्र मा रारा जेश्वरें आणियली स्वदा रा ॥ 

रा ज्यासनीं बैसुनि कारभा रारा ष्ट्रीय जो चालवि भक्तथा रा ॥७॥

र्नी मुखीं ज्या प्रिय आत्मना वाळ त्याच्यावरि पूर्णका ॥ 

रास्ती वाढवि सौख्यधा दोद्धतांचा करुनी विरा ॥८॥"

पतितपावना रामा श्लोकाष्टक तुझें तुषां ॥ विष्णू कृष्ण जगन्नाथा रचिलें स्फूर्तिनें तुझ्या ॥ ९ ॥

भाषाशास्त्राचें कांहींच ज्ञान नसतां उत्तम कविवर्यांच्या पंक्तीस बसण्याजोगी कविता भट्टजीमहाराजांनी केली, यावरून त्यांची योग्यता सामान्य नव्हती हें सहज लक्षांत येतें. ईश्वरी अनुग्रहावांचून असें घडणें फार कठीण आहे. अस्तु.

यापेक्षां भट्टजीमहाराजांचें विस्तृत चरित त्यांच्या काव्यासह लवकरच प्रसिद्ध होईल अशी आम्हांस मिळालेल्या खात्रीपूर्वक माहितीवरून मोठी उमेद वाटते.

No comments: